न्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना न्याय मिळवून देणार : नाना पटोले


- गडचिरोली येथे पत्रकार परिषद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या देशात कार्यरत सरकार विध्वंसक कारवाया करायला निघालेले आहे. यामुळे सर्वत्र गोरगरीबांचे हाल होत आहेत. यामुळे काॅंग्रेस पक्षाने आपल्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविली असून शांततेच्या व न्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून देशातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना न्याय मिळवून देणार, असे माजी खासदार तथा काॅंग्रेसचे शेतकरी, शेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
आज १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. पत्रकार परिषदेला काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, प्रकाश इटनकर, माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, लोकसभा युवक काॅंग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जेसा मोटवानी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीपूर्वी राज्यात ५ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारला हे जमले नसून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य केले गेले. यामुळे काॅंग्रेस पक्षाने आपल्या लोकांना एकत्रित आणून देशपातळीवर सुध्दा ही भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात लागू केलेल्या पेसा अधिसुचनेबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यपालांनी सबंधित भागाची भौगोलिक स्थिती पाहून पेसा अधिसूचना लागू करण्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता.  सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे उध्वस्त करून तेलंगणासाठी मेडीगट्टा ला परवानगी देण्यात आली. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. अनेक झाडे तोडण्यात आली. मात्र याचा कोणताही फायदा महाराष्ट्राला होणार नाही. या प्रकल्पाता परवानगी देताना कोणतीही अडचण नाही मग जिल्ह्यात खोळंबलेल्या सिंचन प्रश्नावर या सरकारला जाग का येत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. 
सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात लोहखनीजांची वाहतूक केली जात आहे. मात्र प्रकल्प येथेच सुरू झाल्यास बेरोजगारी नक्कीच कमी होईल आणि कुठेही भीक मागण्याची पाळी या जिल्ह्यावर येणार नाही. मात्र असे न करता जनतेच्या पैशांचा गैरवापर करीत ४८ किलोमीटरपर्यंत पोलिस संरक्षण देवून खनिजे वाहून नेली जात आहे. 
देशातील कोणत्याही राज्यातील शेतकरी समाधानी नाही. हमीभावाची नुसती घोषणा केली गेली. कर्जमाफी फसवी ठरली. खताचे भाव वाढविले. ५० किलो खताची बॅग ४५ किलोची केली. यामुळे शेतकरीसुध्दा हवालदील झाला आहे. सर्व प्रक्रिया आॅनलाईन करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार अशा सर्वांची लुट करणार्या या सरकारविरूध्द सर्वांना एकत्रित करून न्याय देण्याचे कार्य काॅंग्रेस पक्षामार्फत केले जाणार आहे, असे खा. नाना पटोले म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-19


Related Photos