महाराष्ट्रातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- पंचशील नगर येथे प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानातून उभारलेल्या दोन इमारतींचे उद्घाटन; १४० सदनिकांचे चावीवाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवास स्थानांसोबतच मालकी हक्काने घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना भविष्यात स्वतःच्या हक्काच्या घराची चिंता राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील कुलाबा येथील पंचशील नगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन इमारतींमधील १४० सदनिकांच्या उद्घाटन व चावी वितरण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. विशेष म्हणजे, प्री-फॅब्रिकेटेड (पूर्वनिर्मित) तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेली ही मुंबई महानगरपालिकेची पहिली इमारत ठरली आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने समाजाला निरोगी ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सन्मानाने आणि प्रशस्त घरात राहता आले पाहिजे. ही जबाबदारी शासनाची आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणि वाल्मिकी गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्याबरोबरच भविष्यात त्यांच्या कुटुंबाला निवासाची सुरक्षितता मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याच्या पश्चात त्याच्या जागी सेवेत रुजू होणाऱ्या मुलाला हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. सन २०२८ पर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा महापालिकेचा पहिलाच प्रयोग -
प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा आतापर्यंत प्रामुख्याने मोठ्या खासगी बांधकाम प्रकल्पांमध्ये वापर केला जात होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेने प्रथमच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कर्मचाऱ्यांसाठी इमारत उभारली आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकामाला गती मिळण्यास मदत झाली आहे. तसेच इमारतीच्या परिसरात रहिवाशांसाठी आवश्यक सामूहिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका ही आशियातील तुलनेने संपन्न महानगरपालिकांपैकी एक असून, तिच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दर्जेदार आणि प्रशस्त निवासस्थान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लाडपागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी -
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लाडपागे समितीची स्थापना १९७३ मध्ये करण्यात आली होती. काही कारणांमुळे या समितीचे कामकाज बंद पडले होते. त्यानंतर २०१५ मध्ये शासन निर्णयाद्वारे ही समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आणि वारस पद्धती लागू करण्यात आली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील न्यायालयीन लढाही शासनाने जिंकला असून, लाडपागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. याशिवाय कंत्राटी, रोजंदारी आणि ऐवजदार पद्धतीने काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन व आवश्यक सोयी-सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे -
मुंबईकर गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून शहराचे आरोग्य जपण्याचे काम करतात. कोविड महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान असो किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती असो, प्रत्येक वेळी हे कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पार पाडतात.
त्यामुळे मुंबईचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारीच आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मुंबईतील १४६ कर्मचारी वसाहतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करून कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थाने देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत पूर्वी १५० चौरस फुटांच्या घराऐवजी आता ३०० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून या इमारती जलदगतीने उभारल्या आहेत. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील प्रकल्पांनाही गती देणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
अनेक स्वच्छता कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. त्यांना दररोज रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासाचा त्यांच्या आरोग्यावर आणि कामाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मुंबईतच सेवा निवासस्थाने उपलब्ध झाल्यास त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल, आरोग्य सुधारेल आणि शहराच्या स्वच्छतेच्या कामालाही अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, त्यांनी डॉक्टर, अभियंता, वकील आणि वास्तुविशारद बनून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या उच्च शिक्षणाकरिता स्वतंत्र योजना तयार करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
२९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – ॲड. राहुल नार्वेकर
मुंबईतील सुमारे २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात पंचशील नगर येथील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे. मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
पंचशील नगर येथे दोन इमारतींमध्ये एकूण १४० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये दहा लिफ्टसह आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच परिसर स्वच्छ व सुटसुटीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून, मुलांना अभ्यासासाठी सुविधा आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना चांगले जीवनमान मिळण्यास मदत होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
आश्रय योजनेतून १२ हजार १४४ घरांची उभारणी -
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबईतील ३० वसाहतींचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांत पुनर्विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना एकूण १२ हजार १४४ घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये ३०० चौरस फुटांच्या ११ हजार ३७१ सदनिका आणि ६०० चौरस फुटांच्या ७७३ सदनिकांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे.
सहा कर्मचाऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात चाव्यांचे वितरण -
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते फीत कापून पंचशील नगर येथील नवनिर्मित इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी सदनिकांची पाहणी केली. या वेळी सहा स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात त्यांच्या सदनिकांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये भारती धोत्रे, सचिन सोलंकी, वंदना गोरेगावकर, श्यामसिंग वाल्मिकी, प्रशांत सावंत आणि सतीश मार्चंडे यांचा समावेश होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे मुंबईतील हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सुरक्षित निवासाची संधी उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.




Petrol Price




