महत्वाच्या बातम्या

 डीएमएफ प्रमा कथित ४ कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी


- जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा; आजाद समाज पार्टीचे राज बन्सोड यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील डीएमएफ (जिल्हा खनिज प्रतिष्ठान) अंतर्गत प्रमा प्रकरणातील कथित चार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत उच्चस्तरीय, वेळबद्ध व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे. चौकशी प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी पक्षाचे नेते राज बन्सोड यांनी केली आहे.

राज बन्सोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा खनिकर्म विभाग यापूर्वीही विविध कारणांनी चर्चेत राहिला असून, आता प्रमा प्रकरणात कथित बनावट स्वाक्षऱ्या आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आल्याचा आरोप आहे. एवढ्या संवेदनशील विभागात असा प्रकार घडणे ही गंभीर बाब असून, अशा स्वरूपाचे प्रकार यापूर्वीही झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हा कथित गैरव्यवहार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, त्यामागे काही प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची साखळी असण्याची शक्यता असल्याचा दावा आजाद समाज पार्टीने केला आहे. त्यामुळे तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात आशिष पिपरे यांचे राज्यातील काही प्रमुख राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्याची चर्चा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका असून, स्वतः आशिष पिपरे हे काँग्रेस गटातून स्वीकृत नगरसेवक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच, भाजपने त्यांची तीन महिन्यांपूर्वी हकालपट्टी केल्याचा दावा केला जात असला, तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

जिल्ह्यात एवढ्या मोठ्या स्वरूपाचा कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतरही प्रमुख राजकीय पक्षांकडून ठोस भूमिका समोर आलेली नसल्याबद्दलही आजाद समाज पार्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गेल्या पाच ते सात दिवसांपासून तपास सुरू असतानाही इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची नावे समोर आलेली नसल्याने पोलीस तपासाच्या गतीबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

राज बन्सोड यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जनतेच्या पैशाचा अपहार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण मिळता कामा नये, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मागणीसंदर्भात खनिकर्म महासंचालक, नागपूर यांना निवेदन पाठविण्यात आले असून, मंगळवारी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही किंवा तपास दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आजाद समाज पार्टी जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos