महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत गांजा तस्करीविरोधात कारवाई : युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा धंदा उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ जून रोजी भद्रावती शहरातील गुरूनगर परिसरात धडक कारवाई करीत गांजा विक्रीच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत ६२० ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी गांजा व मोबाईल असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती येथील गुरूनगर परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी गुरूदास उर्फ चेतन भास्कर पोईनकर (वय २३) याच्या राहत्या घराची झडती घेतली असता विक्रीसाठी साठवून ठेवलेला ६२० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी हा पानटपरीवर काम करीत असताना गुप्तपणे गांजाची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ईशांत मानकर याच्या संगनमताने हा गांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. कारवाईची माहिती मिळताच ईशांत मानकर फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत ६ हजार रुपये किमतीचा गांजा व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला भद्रावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक काँक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार स्वामी चालेकर, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, किशोर वैरागडे, अजय बागेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, महिला पोलीस अंमलदार पूजा पंधरे, चालक दिनेश अराडे तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos