महत्वाच्या बातम्या

 पोस्टाच्या पैशांचा अपहार : कोळशी खुर्दच्या शाखा डाकपालावर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द शाखा डाकघरातील खातेदारांकडून बचत, आवर्ती ठेव व इतर योजनांमध्ये जमा करण्यासाठी स्वीकारलेल्या रकमेत सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखा डाकपालाविरुद्ध कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक बाळू बनसोडे (वय २८, रा. मराठी शाळेजवळ, भीमनगर, सांगोला, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शाखा डाकपालाचे नाव आहे. ते कोळशी खुर्द शाखा डाकघरात ३ सप्टेंबर २०२२ ते २५ मार्च २०२५ या कालावधीत कार्यरत होते.

डाक निरीक्षक अनिल गोविंदराव टेकाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मार्च २०२५ रोजी बनसोडे यांनी वैद्यकीय रजेचा अर्ज दिला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी कोळशी खुर्द येथील शाखा डाकघर बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर डाक निरीक्षक व टपाल पर्यवेक्षक मिथुन टोंगे यांनी तेथे भेट दिली. डाकघर बंद असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर कार्यालय उघडून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान विविध ग्राहकांनी खाती उघडण्यासाठी भरलेले अर्ज आणि जमा करण्यासाठी दिलेल्या रकमेशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर गावातील खात्यांची पडताळणी तसेच शाखा डाकघरातील विविध खातेपुस्तकांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही खातेदारांकडून रक्कम स्वीकारून ती सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचे निदर्शनास आले.

२१ ऑगस्ट २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत काही खातेदारांनी सावधि जमा, सुकन्या योजना तसेच बंद असलेल्या आवर्ती ठेव खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी बनसोडे यांच्याकडे पैसे दिले होते. संबंधित रकमेबाबत खातेदारांना काउंटर फाईलवर स्वाक्षरी व शिक्का देण्यात आला; मात्र रक्कम विभागाच्या सरकारी खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारे खातेदारांकडून स्वीकारलेल्या रकमेतून अंदाजे १ लाख १४ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाचा चौकशी अहवाल १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवर अधीक्षक डाक विभाग, चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मूळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी कोरपना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास कोरपना पोलिस ठाण्याच्या ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार करीत आहेत.





  Print






Related Photos