महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे आधुनिक स्मशानभूमी उभारण्याची मागणी : मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरील आष्टी परिसर आजही शासनाच्या गाव तिथे स्मशानभूमी योजनेपासून वंचित असल्याने येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी प्रा. डॉ. भारत पांडे यांनी केली आहे. ओम विकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरच्या वतीने त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री सचिवालयात प्रत्यक्ष भेट देऊन लेखी निवेदन सादर केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गाव तिथे स्मशानभूमी या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये स्मशानभूमीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावरील आष्टी हे मध्यवर्ती गाव अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे प्रा. डॉ. पांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

आष्टीच्या वैनगंगा नदीच्या दोन्ही तीरांवर आष्टी, मार्कंडा (कंसोब), तारसा, राडापेट, विठ्ठलवाडा, तळोदी, गोंडपिपरी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिक अंत्यसंस्कारासाठी येतात. मात्र, या ठिकाणी कोणतीही अधिकृत किंवा सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना नदीकाठच्या मोकळ्या जागेत पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावे लागतात.

स्मशानभूमीची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भर पावसात, कडक उन्हात किंवा रात्रीच्या वेळी अंत्यविधी पार पाडावे लागतात. अनेकदा मृतदेह दूरच्या गावांमधून आणला जातो किंवा पोलीस प्रकरणे, शवविच्छेदन (पोस्टमार्टम) यांसारख्या शासकीय प्रक्रियांमुळे मृतदेह उशिरा पोहोचतो. अशा परिस्थितीत अंधारात वाहनांच्या किंवा मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात.

याशिवाय, ऊन, वारा, थंडी किंवा अचानक पाऊस आल्यास अंत्यविधीस्थळी थांबणे अत्यंत कठीण होते. बहुतांश लोक तेथून निघून जातात आणि केवळ मृताच्या नातेवाईकांनाच त्या परिस्थितीत थांबावे लागते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची गरज प्रकर्षाने जाणवत असल्याचे प्रा. डॉ. पांडे यांनी म्हटले आहे.

सध्या सुरजागड प्रकल्प, लॉयड मेटल्स कोनसरीसह विविध औद्योगिक उपक्रमांमुळे या परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या रहदारीमुळे नदीकाठावर मृतदेह घेऊन जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. काहीवेळा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सुसज्ज स्मशानभूमीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रा. डॉ. भारत पांडे यांनी शासनाकडे आष्टीच्या वैनगंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर आधुनिक स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली आहे. या स्मशानभूमीत वीज व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, नदीकाठी उतरण्यासाठी पायऱ्या, धार्मिक विधींसाठी बसण्याची व्यवस्था, सावलीसाठी शेड, तसेच भविष्यात लाकडाची उपलब्धता कमी झाल्यास आधुनिक विद्युत अथवा यांत्रिक दहन यंत्राची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून शासनाने गाव तिथे स्मशानभूमी योजनेअंतर्गत आष्टी येथे लवकरात लवकर आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी अपेक्षा प्रा. डॉ. भारत पांडे यांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos