एक वर्षांसाठी निवडणुका पुढे ढकलून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : माजी मंत्री रणजित देशमुख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
'राज्यातील पूरस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसह राज्यातील सर्व निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकलून राष्ट्रपती राजवट लागू करावी,' अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांनी केली आहे.
'पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी हानी झालेली आहे. पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुका व पुनर्वसन एकाचवेळी शक्य नाही त्यामुळे निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकला,' अशी मागणी रणजित देशमुखांनी केली आहे.
कोल्हापूर ,सांगली, सातारा, रत्नागिरी, व मुंबईसह राज्याच्या अन्य भागातही पुरामुळे हानी झालेली आहे, विदर्भासह अन्य जिल्यानाही पुराचा जबर फटका बसला. विधानसभा निवडणुकीसोबतच पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे शक्य होणार नाही, असं मतही माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकतीच विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 'ऑक्टोबरमध्ये निवडणुका असतील तर सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल. मग मदत करण्याऐवजी सरकार हात वर करेल. मला असं वाटतं की निवडणुका पुढचा वर्षी घ्या,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.  Print


News - Nagpur | Posted : 2019-08-11


Related Photos