महत्वाच्या बातम्या

 वायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाणी प्रश्न मार्गी


विदर्भ  न्यूज  एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र वायगाव निपाणी येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर कायमस्वरुपी मार्गी लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक प्रशासनिक प्रयत्नांमुळे हा महत्वाचा प्रश्न निकाली निघाला.

आजगाव येथून प्राथमिक आरोग्य केंद्र वायगाव निपाणी पर्यंत नवीन पाणी पुरवठा पाइपलाईन टाकण्यात आली असून ३० जुन रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी दिघेकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल राठोड यांच्या हस्ते जलपुजन करुन नवीन पाणीपुरवठा व्यवस्थेचा शुभारंभ करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच नियमित पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन आरोग्यसेवा सुरळीतपणे देण्यासाठी आवश्यक असलेली मुलभूत सुविधा उपलब्ध झाली आहे.

पाण्याअभावी आरोग्य सेवा देतांना विविध अडचणी निर्माण होत होत्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह अधिकारी व कर्मचारी यांना देखील गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

या महत्वपूर्ण कार्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील ग्रामस्थ, रुग्ण, अधिकारी व कर्मचा-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवा ह्या पूर्वीप्रमाणेच तथा अधिक प्रभावीपणे नागरिकांच्या सेवेत निरंतर कार्यरत राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.स्वप्नील बेले यांनी केले आहे.







  Print






News - Wardha




Related Photos