इंजि. प्रमोद पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती


- माजी खासदार रामदास तडस यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी; समाजबांधवांकडून स्वागत व अभिनंदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी इंजि. प्रमोद पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार रामदासजी तडस यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील तैलिक महासभेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महासभेने जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, यापूर्वी गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले आशीष अरुण पिपरे यांची नियुक्ती काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली असून, त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर तत्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणीलाही महासभेने मान्यता दिली आहे.
इंजि. प्रमोदजी पिपरे हे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अनुभवी पदाधिकारी असून त्यांनी यापूर्वीही गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. तेली समाजाच्या संघटनात्मक उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा, समाजातील सर्व घटकांशी असलेला व्यापक संपर्क, जिल्हाभरातील सातत्यपूर्ण दौरे आणि संघटन उभारणीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोलीसारख्या विस्तीर्ण आणि दुर्गम जिल्ह्यात समाजसंघटन अधिक मजबूत करणे, युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक एकात्मता वाढविणे तसेच समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणे, या दृष्टीने इंजि. प्रमोदजी पिपरे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच तैलिक समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्य अधिक व्यापक, प्रभावी आणि गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नियुक्तीनंतर इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या प्रदेश नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम करण्यासाठी, समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी आणि तैलिक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
News - Gadchiroli




Petrol Price




