एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या : आरोपी विवेक चौधरीला जन्मठेप


- चंद्रपूर विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; डीएनए पुरावे ठरले निर्णायक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी दबाव टाकत २७ वर्षीय तरुणीची घरात घुसून गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी विवेक ब्रह्मदास चौधरी (२९) याला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश आय. ए. शेख यांनी दिलेल्या निकालानुसार आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
प्रकरणातील मृत तरुणीचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. मात्र, पतीशी मतभेद झाल्याने ती एप्रिल २०२१ पासून नागभीड येथे आपल्या आईकडे राहत होती. दरम्यान, तिच्या पतीचा शेजारी असलेला विवेक चौधरी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने वारंवार लग्नासाठी दबाव टाकत, माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
१४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सुमारे १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान आरोपी विवेक चौधरी याने तरुणीच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. घटनेच्या वेळी घराबाहेर गेलेली आई परत आली असता तिला आरोपी तरुणीचा गळा चिरत असल्याचे प्रत्यक्ष दिसले. आईने आरडाओरड केल्यानंतर आरोपी मागील दरवाजातून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३०९/२०२१ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एस. बी. रामटेके यांनी प्रभावी बाजू मांडत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये मृत तरुणीच्या आईची प्रत्यक्षदर्शी साक्ष, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला रक्ताळलेला चाकू तसेच प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (आरएफएसएल), नागपूर येथील डीएनए अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले. आरोपीच्या कपड्यांवरील आणि जप्त चाकूवरील रक्ताचे नमुने मृत तरुणीच्या रक्ताशी तंतोतंत जुळल्याचे वैज्ञानिक तपासणीत स्पष्ट झाले.
या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी विवेक चौधरी याला दोषी ठरवत १९ जून २०२६ रोजी शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ४५० अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, कलम ३५४-डी अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच कलम ५०६ (भाग-२) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संबंधित दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या निकालामुळे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून वैज्ञानिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




