विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश : 'एमपीएससी'ची परीक्षा २१ मार्चला होणार


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या म्हणजे शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
यानुसार आज एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. पुण्यात शेकडो विद्यार्थी नवी पेठेत ठिय्या देऊन बसल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो वेळीच अटोक्यात आणला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षा रविवार, दिनांक २१ मार्च, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले आहे.
याचबरोबर शनिवार, दिनांक २७ मार्च, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० तसेच रविवार, दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आ'लेला नाही.
  Print


News - Rajy | Posted : 2021-03-12


Related Photos