महत्वाच्या बातम्या

 पोलीस बनून अडवले, विश्वास संपादन केला आणि लाखोंचे दागिने घेऊन पसार झाले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील भानापेठ परिसरातील एका मेडिकल व्यावसायिकाची पोलीस असल्याचे भासवून तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानापेठ वार्ड येथील रहिवासी व मेडिकल शॉप चालक अजय शंकरराव अल्लुरवार (वय ५४) हे सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चा मागील जामा मशिदीजवळील माधव दूध डेअरी येथे दूध घेण्यासाठी गेले होते. दूध घेऊन ते आपल्या ज्युपिटर मोपेडने घरी परतत असताना जामा मशिदीजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.

या इसमांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखविले. शहरात सोन्याचे दागिने घालून फिरू नये, असा आदेश असल्याचे सांगून त्यांनी अल्लुरवार यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चेन, हातातील सोन्याचा कडा आणि सहा सोन्याच्या अंगठ्या काढण्यास सांगितले. दागिने खिशात ठेवू नका, पडतील असे सांगत आरोपींनी कागदात पुडी बांधून देण्याचा बहाणा केला.

दरम्यान, आरोपींनी अल्लुरवार यांचे लक्ष दुसरीकडे वळवून पुड्यांची अदलाबदल केली. त्यानंतर त्या पुड्या गाडीच्या डिकीत ठेवण्यास सांगून आरोपी तेथून निघून गेले. काही अंतर गेल्यानंतर अल्लुरवार यांनी पुड्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये मूळ सोन्याचे दागिने नसून इतर धातूच्या अंगठ्या व पिवळ्या रंगाचा कडा असल्याचे आढळले.

या प्रकारात आरोपींनी अंदाजे १२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन किंमत ८० हजार रुपये, २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा कडा किंमत ८० हजार रुपये तसेच ३० ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या किंमत १ लाख २० हजार रुपये असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज फसवणुकीने लंपास केला.

अल्लुरवार यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos