महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात अंत्योदयच्या ६६ हजार १०४ अंत्योदय कार्डधारकांना मिळणार मोफत साडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्य शासनाने जिल्ह्यातील ६६ हजार १०४ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून यासाठी शासनाकडे एवढ्या साड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून २३ जानेवारीला यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला आदेश देण्यात आले आहेत. रेशन दुकानातून प्रजासत्ताक दिन ते होळी अर्थात २४ मार्च या काळात या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रतिकार्ड एक साडी मोफत दिली जाणार आहे.

राज्य यंत्रमाग महामंडळाव्दारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठठे तयार करून प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचविण्यात येणार आहेत. या सर्व बाबींची ऑनलाइन नोंद ठेवली जाणार आहे.

पाच वर्षांसाठी आहे योजना ; 
२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. दरवर्षी प्रतिकुटुंब ३५५ रुपये किमतीची एक साडी मोफत दिली जाणार आहे. राज्यात जवळपास २४.५८ लाख कुटुंबांकडे अंत्योदय कार्ड असल्याने त्यांना याचा राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा लाभ मिळणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातून मिळणार साडी : 
अंत्योदय कार्ड असलेल्या कुटुंबांतील महिलेला दरवर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. साड्यांचे वितरण स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्यासह आता साडीचेही वितरण होणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक कुटुंबीयांना प्रत्येकी एक साडी स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणार आहे. यांसदर्भातील नियोजन पुरवठा विभागाकडून केले जात आहे. होळीच्या सणापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका एक याप्रमाणे वितरण केले जाणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos