महत्वाच्या बातम्या

 मोरवा अत्याचारप्रकरणी विधानसभेत आक्रमक झाले आ. सुधीर मुनगंटीवार : दोषीला कठोर शिक्षेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा येथील वसाहतीत अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेचे पडसाद राज्य विधानसभेत उमटले. या प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य शासनाचे लक्ष वेधले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मोरवा परिसरात २८ जून रोजी घडलेल्या या घटनेत शेजारी राहणाऱ्या ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीवर बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेत बोलताना आ. मुनगंटीवार यांनी या घटनेचा जलद, निष्पक्ष आणि प्रभावी तपास करण्यात यावा तसेच दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशी मागणी केली. वाढत्या बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीडित बालिकेला तातडीने तज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार, मानसोपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून न्याय प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात अधोरेखित केले.

बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाने अधिक कठोर आणि प्रभावी भूमिका स्वीकारावी तसेच अशा अमानुष कृत्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos