महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर पोलिसांचा सापळा : तेलंगणात नेली जाणारी अवैध दारू पकडली, ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी २२ जून रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील भेंडे नाल्याजवळ धडक कारवाई करत तेलंगणा राज्यात नेली जात असलेली अवैध विदेशी दारू पकडली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वाहनासह ५ लाख २३ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बल्लारपूर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भेंडे नाल्याजवळ नाकाबंदी केली होती. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास संशयित मारुती सुझुकी सियाझ क्रं. टीएस १० ईई ९६१८ वाहन तेथे येताच ते अडवून तपासणी करण्यात आली.

वाहनाच्या डिकीतून विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये लँडन पिल्सनर प्रीमियम बिअर, रॉयल चॅलेंज प्रीमियम लेगर बिअर तसेच रॉयल चॅलेंज प्रीमियम सुपर क्रिस्प लेगर बिअरचा समावेश आहे. एकूण १० पेट्या मद्यसाठ्यासह वाहन जप्त करण्यात आले.

या कारवाईत ५ लाख रुपये किंमतीची कार व २३ हजार १६० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा असा एकूण ५ लाख २३ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नविनकुमार सत्यनारायणा वासाला (वय ३०) व सुरजकुमार श्रीकांत गुडला (वय १९), दोघेही जिल्हा जगत्याल, तेलंगणा येथील रहिवासी, यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बिपिन इंगळे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा लालू यादव, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, पोअं सचिन अल्लेपार, लखन चव्हाण, खंडेराव माने, वैभव गाडगे व महेश कुकुडकर यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos