महत्वाच्या बातम्या

 २ लाख ३० हजार बालकांना देण्यात येणार जंतनाशक गोळया


 - १३फेब्रुवारी जंतनाशक दिन

विदर्भ न्यूज एक्सप्रेवश 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १३ फेब्रुवारी २०२४ व मॉपअप दिन २० फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामिण व शहरी भागातील १ ते १९ वर्षे वयोगटातील २ लक्ष २९ हजार ९६७ बालकांना जंतनाशक गोळया खाऊ घालण्यात येणार आहेत. भंडारा तालुक्यात १० फेब्रुवारी २०२४ पासुन हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविण्यात येत असल्यामुळे भंडारा तालुक्यात जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार नाही. उर्वरीत मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यात जंतनाशक दिन मोहिमेसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), महिला व बाल विकास विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जानेवारी २०२४ रोजी आयोजीत जिल्हा दक्षता समिती सभेत सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळया पोहचवून त्यास ती खाऊ घालतील, तसे गोळया खाऊ घातलेल्या प्रत्येक बालकाची नोंदी ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

जंतनाशक दिनानिमीत्त आयोजीत जिल्हा दक्षता समिती सभेत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोयाम, जिल्हा माताबाल संगोपण व लसीकरण अधिकारी डॉ.मनिषा साकोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र धनविजय, तालुका आरोग्य अधिकारी, तसेच शिक्षण विभाग व बाल विकास विभागाअंतर्गत अधिकारी सभेला उपस्थित होते.

आरोग्य विभाग, शिक्षण (प्राथमिक व माध्यमिक) व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील शाळा/विद्यालय/महाविद्यालय/ तांत्रिक संस्था ११३९, अंगणवाडी केंद्र ११६२ व आरोग्य संस्था इत्यादी ठिकाणी जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरीता अल्बेंडाझॉलची गोळी वयोगटानुसार देण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी अंगणवाडी, शासकिय व निमशासकिय शाळा, विद्यालय, महाविद्यालय व तांत्रिक संस्था तसेच शाळाबाहय विदयार्थ्यांना समुदाय स्तरावर अल्बेंडाझॉलची ही जंतनाशकगोळी गोळी देण्यात येणार आहे. या दिवशी सर्व विदयार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या, आजारपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे अल्बेंडाझॉलची गोळी सेवन न केलेल्या विदयार्थ्यांना २० फेब्रुवारी २०२४ आयोजीत मॉप-अप दिनी अंगणवाडी, शासकिय व निमशासकिय शाळा, विद्यालय, महाविद्यालय व तांत्रिक संस्था व शाळाबाहय विदयार्थ्यांना अल्बेंडाझॉलची गोळी खाऊ घालण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच १३ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत जंतनाशक गोळया खाऊ घालण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे.

अल्बेंडाझॉलची गोळी वयोगटानुसार सेवन केल्यास कोणतेही दूष्परिणाम नसल्याने शासकिय, खासगी शाळेत किंवा अंगणवाडीत विदयार्थ्यांना अल्बेंडाझॉलची गोळी वयोगटानुसार देण्याकरीता पालकांची संमतीची आवश्यकता नाही. परिणामी जंतनाशक गोळयांचे परिणाम व महत्व पठवून देण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. १ ते १९ वयोगटातील १०० टक्के विदयार्थ्यांना जंतनाशक गोळया खाऊ घालण्यात यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

  Print


News - Bhandara
Related Photos