सराईत वाहनचोर मेंढीवर एलसीबीचा शिकंजा : ६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या महेश उर्फ मेंढी सुरेश पटकूटवार (वय २८), रा. साईबाबा वॉर्ड, कोरपना, ता. कोरपना, जि. चंद्रपूर या सराईत वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान, कोरपना परिसरात एक सराईत वाहनचोर असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्याआधारे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून हिरो स्प्लेंडर, स्प्लेंडर प्रो, पॅशन प्रो आदी कंपनीच्या एकूण सहा मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागला.
तपासादरम्यान आरोपीकडून राजुरा पोलीस ठाण्यातील दोन, चंद्रपूर शहर, पडोली, रामनगर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सहा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवर, बलराम झाडोकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोलीस हवालदार अजय बागेसर, किशोर वैरागडे, गणेश भोयर, जयंता चुनारकर, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




