महत्वाच्या बातम्या

 सर्वोत्कृष्ट शेतकरी गट पुरस्कारासाठी अर्ज करा : १५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा व कृषि विभागाच्या वतीने कृषि व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना सर्वोत्कृष्ट शेतकरी गट पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटांची खुल्या स्पर्धेद्वारे निवड करण्यात येणार असून, स्पर्धेचा कालावधी १५ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ असा आहे.

स्पर्धेत जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धती, पीक विविधीकरण, नवोपक्रम, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच नोंदी व दस्तऐवजीकरण या बाबींवर गटांचे मूल्यांकन करण्यात येईल. जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० गटांना प्रत्येकी २५ हजार रुपये, तर तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट ५ गटांना प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेसाठी गटाकडे आत्माअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र व राष्ट्रीयकृत बँकेतील खाते असणे आवश्यक आहे. यापूर्वी आत्मा किंवा अन्य यंत्रणेकडून गट पुरस्कार प्राप्त केलेले गट पात्र राहणार नाहीत. गटातील किमान ५० टक्के सदस्य लहान व सीमांत शेतकरी असणे बंधनकारक असून महिला व SC/ST सदस्यांना पुरेसे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया : पात्र गटांनी Google Form द्वारे अर्ज सादर करावा. Google Form ची लिंक संबंधित तालुका कृषि कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जासोबत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी आणि बँक पासबुकची प्रत किंवा रद्द धनादेश जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ आहे.

गट शेतीला चालना देणे, नैसर्गिक शेती व हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा उर्मिला चिखले यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos