घोडाझरी पाणीपुरवठा योजनेतील लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी : नागभीडकरांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड शहराला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घोडाझरी पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन गळतीमुळे नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
योजनेच्या पाइपलाइनमध्ये ठिकठिकाणी झालेल्या लिकेजमधून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, त्याचा परिणाम शहरातील विविध प्रभागांमधील पाणीपुरवठ्यावर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
घोडाझरी पाणीपुरवठा योजना सुरू होण्यापूर्वी नागभीड शहराला तपाळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत होते. सन ९९९ मध्ये सुरू झालेली ही योजना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास अपुरी पडू लागल्याने शहरासाठी नवीन घोडाझरी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
नगरोत्थान योजनेंतर्गत या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी देण्यात आली. शासनाकडून यासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मंजुरीनंतर दोन वर्षांच्या कालावधीत योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला चार वर्षांहून अधिक कालावधी लागला. अखेर ऑक्टोबर २०२४ पासून नागभीड नगर परिषद क्षेत्रात या योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
मात्र, योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाइपलाइनमधील गळतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. योजनेचे काम पूर्ण करताना पाइपलाइनची योग्य तपासणी व चाचणी न झाल्याने अनेक ठिकाणी लिकेज कायम राहिल्याचा आरोप केला जात आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, शहरातील अनेक भागांमध्ये पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
गळती बंद करण्यासाठी नागभीड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी लिकेज शोधून त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून, मात्र शहरातील मोठ्या क्षेत्रात पसरलेल्या पाइपलाइनमुळे हे काम आव्हानात्मक ठरत आहे.
याबाबत नगर परिषद उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक कमलकुमार भसीन यांनी सांगितले, गेल्या सहा महिन्यांपासून नगर परिषदेत पाणीपुरवठा सभापती म्हणून काम पाहत आहे. या कालावधीत माझ्या देखरेखीखाली २५० हून अधिक लिकेज बंद करण्यात आले आहेत. तरीही अनेक प्रभागांतून दररोज लिकेजबाबत तक्रारी येत आहेत. या गळतीमुळेच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
संबंधित एजन्सीने योजनेचे काम योग्य पद्धतीने केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या घोडाझरी पाणीपुरवठा योजनेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने सर्व लिकेज तातडीने बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागभीडकरांकडून होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




