महत्वाच्या बातम्या

 जेसीबी खरेदीच्या आमिषातून साडेपाच लाखांची फसवणूक


- सालेकसा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा; फोन-पे व आरटीजीएसद्वारे घेतली रक्कम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : बांधकामासाठी जेसीबी मशीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी संगनमताने एका तरुणाकडून तब्बल ५ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार सालेकसा तालुक्यात समोर आला आहे. जेसीबी मशीनची किंमत २१ लाख रुपये असल्याचे सांगून टोकन रकमेच्या नावाखाली सुरुवातीला पैसे घेण्यात आले. त्यानंतर आरटीजीएस आणि फोन-पेद्वारे मोठी रक्कम स्वीकारल्यानंतरही जेसीबी मशीन न दिल्याने संबंधित तरुणाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भूमेश विजय कटरे २९ वर्ष रा. दरबडा, ता. सालेकसा याला बांधकामासाठी जेसीबी मशीनची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने जेसीबी मशीन खरेदीबाबत मनोज चुन्नीलाल बल्हारे ३८ वर्ष  रा. पांढरी, ह.मु. द्वारकाधाम, आमगाव याच्याकडे विचारणा केली. मनोज बल्हारे याने राकेश देवेंद्र पवार ऊर्फ ऋषी पवार ४० वर्ष रा. मनकापूर, नागपूर  याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राकेश पवार याने जेसीबी मशीनचे फोटो भूमेशकडे पाठविले.

आरोपींनी संबंधित जेसीबी मशीनची किंमत २१ लाख रुपये असल्याचे भूमेशला सांगितले. मशीन खरेदीसाठी टोकन अर्थात बयाना म्हणून ५० हजार रुपये ऑनलाइन पाठविण्याची मागणी करण्यात आली. आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून भूमेशने ६ जून २०२६ रोजी राकेश पवार याच्या सोनल रेस्टॉरंट या नावाने असलेल्या फोन-पे स्कॅनरवर २१ हजार रुपये ऑनलाइन पाठविले.

त्यानंतर ८ जून रोजी भूमेशने याच सोनल रेस्टॉरंट च्या नावाने असलेल्या एसबीआय बँक खात्यावर तब्बल ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. एवढी मोठी रक्कम पाठवल्यानंतरही जेसीबी मशीन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर ९ जून रोजी राकेश पवार याने टोकनच्या उर्वरित २९ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार भूमेशने आणखी २९ हजार रुपये फोन-पेद्वारे पाठविले.

अशा प्रकारे आरोपींच्या सांगण्यावरून भूमेशने फोन-पे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून एकूण ५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरही आरोपींनी जेसीबी मशीन खरेदी करून दिली नाही. मशीनबाबत वारंवार विचारणा करूनही समाधानकारक माहिती अथवा मशीन मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे भूमेशच्या लक्षात आले.

जेसीबी मशीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून राकेश पवार आणि मनोज बल्हारे यांनी संगनमताने आपली फसवणूक केल्याची तक्रार भूमेशने सालेकसा पोलिसांत दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राकेश देवेंद्र पवार ऊर्फ ऋषी पवार आणि मनोज चुन्नीलाल बल्हारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून अवघ्या काही दिवसांत ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम आरोपींकडे वर्ग झाल्याने या प्रकरणात डिजिटल व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. संबंधित बँक खाते, फोन-पे व्यवहार तसेच आरोपींनी दाखविलेल्या जेसीबी मशीनची माहिती याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos