भंडारा जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी रविवार, २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच अंगणवाडी केंद्रांवरील पोलिओ बूथवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहिमेच्या दिवशी पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील २,४३० आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि नर्सिंग विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात एकूण १,०४५ पोलिओ बूथ उभारण्यात येणार असून ४८ मोबाईल पथके तसेच रेल्वे स्थानक, बसस्थानके व इतर गर्दीच्या ठिकाणी ७१ विशेष पथकांमार्फत बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घर-ते-घर भेटी (हाऊस-टू-हाऊस) देऊन लसीकरणाची खात्री करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना घरी भेट देऊन लस दिली जाईल. तसेच विटभट्ट्या, बांधकाम स्थळे, स्थलांतरित मजुरांच्या वस्त्या आणि दुर्गम भागांतील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मोहिमेसाठी आवश्यक लसी, मार्कर पेन, मुद्रित साहित्य व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील या मोहिमेत ८३ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देऊन ही मोहीम यशस्वी करावी.
भारताने २०१४ मध्ये पोलिओमुक्त देशाचा दर्जा प्राप्त केला असला तरी शेजारील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
पोलिओ हा गंभीर व कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून त्यापासून संरक्षणासाठी प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे डोस मिळणे अत्यावश्यक आहे. नियमित लसीकरण झालेले असले तरीही प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पालकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा तथा डॉ. संदीपकुमार गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांनी केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




