बाबूपेठमधील तीन पत्ती जुगार अड्ड्यावर एलसीबीचा धाडसी छापा : १० जणांना रंगेहात अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बाबूपेठ परिसरातील एका घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांना रंगेहात अटक केली.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बाबूपेठ येथील आंबेडकर चौक परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात तीन पत्ती जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहितीनुसार, बाबूपेठ येथील रहिवासी गुनवंत सोमाजी आवळे हा आपल्या राहत्या घरी काही इसमांना एकत्र करून पैशांची बाजी लावून तीन पत्ती नावाचा हार-जितीचा जुगार खेळवत असल्याचे समोर आले. माहिती मिळताच संबंधित घरावर अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान घराच्या पहिल्या खोलीत १० इसम गोलाकार बसून ५२ पत्त्यांच्या कॅटवर पैशांची बाजी लावत तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र एलसीबीच्या पथकाने तत्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत गुनवंत सोमाजी आवळे (वय ३५), रॉयल शैलेंद्र पाटीला (वय २७), सचिन प्रल्हाद गोवर्धन (वय ३५), अतुल धनराज ढोक (वय ३६), शामराव प्रल्हाद पिपरे (वय ५२), सचिन मिलिंद मानकर (वय ४०), प्रफुल ज्ञानबा भागवत (वय ३५), सुधीर हिरालाल जांभुळकर (वय ३४), ब्रह्मदेव मोहन गोरी (वय ५४) व अविनाश संजय वासेकर (वय ३०) या दहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी बहुतांश आरोपी बाबूपेठ परिसरातील रहिवासी असून अविनाश वासेकर हा लालपेठ कॉलरी परिसरातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून जुगार अड्ड्याशी संबंधित इतर बाबींची चौकशी सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुट्ठावार, दिपक डोंगरे, इमान खान तसेच पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार आणि स्थानिक गुन्हे शाखेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
News - Chandrapur




Petrol Price




