महत्वाच्या बातम्या

 पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या : विजयलक्ष्मी बिदरी


- मतदार यादी पुनरीक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा

- जिल्ह्यात ७ लाख ३८ हजारांहून अधिक गणना अर्जांचे डिजिटायझेशन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. विशेषतः रोजगारासाठी काही काळ गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ त्याच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळले जाऊ नये. अशा प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक पडताळणी करा आणि संबंधित नागरिकाला आपली बाजू मांडण्याची संधी द्या, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

बिदरी म्हणाल्या की, मतदार यादी अचूक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. पडताळणीदरम्यान पत्ता न लागलेल्या किंवा अनुपस्थित आढळलेल्या मतदारांची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर नागरिकांना सहज दिसेल अशा प्रकारे प्रसिद्ध करावी.

नागरिकांनीही यादीत आपले नाव तपासावे. पात्र असून नाव नसल्यास फॉर्म ६ द्वारे नोंदणीसाठी अर्ज करावा. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने नागरिकांनी नोंदणीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावेत. तसेच दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नोंदणीची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही बिदरी यांनी दिल्या.

बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. १८ जून २०२६ रोजी पर्यंत जिल्ह्यात ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली होती. त्यांच्यासाठी वितरित गणना अर्जांपैकी ७ लाख ३८ हजार २८८ अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून ९० हजार ६१६ अर्ज संकलित होऊ शकलेले नाहीत.

संकलित न झालेल्या अर्जांसंदर्भातील यादीत ३५ हजार ८८६ मृत, ७ हजार ५२९ पत्ता न लागलेले किंवा पडताळणीवेळी अनुपस्थित, ३६ हजार ८३७ कायमस्वरूपी स्थलांतरित, ९८२ इतर आणि ९ हजार ३८२ आधीच नोंदणीकृत असल्याच्या नोंदी आहेत. ही यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डिजिटायझेशन झालेल्या अर्जांपैकी २७ हजार ४१४ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर ५६ हजार ८५२ नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. अशा एकूण ८४ हजार २६६ प्रकरणांमध्ये सुनावणी अपेक्षित असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. जिल्ह्यात ११० साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यरत असून त्यांच्याकडून दररोज प्रत्येकी सरासरी २५ सुनावण्या घेऊन ही प्रक्रिया विहित मुदतीत सुरळीतपणे पूर्ण केली जात आहे.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार रामदास मसराम तसेच उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी दुर्गम भागातील मतदारांच्या अडचणी मांडल्या. रोजगार आणि मिरची तोडणीसाठी काही नागरिक हंगामी स्वरूपात तेलंगणा किंवा अन्य भागांत जात असल्याने त्यांना पडताळणीची माहिती मिळावी व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर तात्पुरत्या अनुपस्थितीची प्रकरणे काळजीपूर्वक पडताळून नियमानुसार निर्णय घेण्याच्या सूचना बिदरी यांनी केल्या.

जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ३ हजार ८९३ बूथ लेव्हल एजंट्सची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मतदार यादीतील नोंदी अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.





  Print






Related Photos