गुंजेवाही जंगलात वाघाचा थरारक हल्ला : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा जागीच मृत्यू

- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात शोककळा; वन विभागाकडून तपास सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. गुंजेवाही-पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा जागीच बळी घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे गुंजेवाहीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील भट्टी मोहल्ला, वार्ड क्रमांक १ येथील महिला नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलनासाठी खैरीचक जंगलात गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. अनपेक्षित झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. वाघाच्या भीषण हल्ल्यात चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे कविता दादाजी मोहुर्ले (४५), अनिता दादाजी मोहुर्ले (४०), संगीता संतोष चौधरी (४०) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३५) अशी आहेत. सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास प्रक्रिया सुरू केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागाने विशेष पथक नियुक्त केले असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, एका दिवसात चार महिलांचा बळी गेल्याने गुंजेवाही परिसरात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून वन विभागाने तातडीने हल्लेखोर वाघाला जेरबंद करावे किंवा त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेकांनी जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन आणि इतर वनउपज गोळा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.
वन विभागाने नागरिकांना पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचे आवाहन केले असून, समूहानेच जंगलात प्रवेश करावा तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, मानव-वन्यप्राणी संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत व योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




