महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेत पेटणार : चार वर्षांपेक्षा यंदा उष्णतेचा तडाखा जास्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुसळधार पाऊस, पूर, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांच्या मालिकानंतर आता राज्यावर यंदा उष्णतेच्या लाटेचे मोठे संकट आहे. मागील तीन-चार वर्षांपेक्षा राज्याला यंदा उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातल्या निम्या जिह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज : मागील तीन-चार वर्षांपेक्षा या वर्षी उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल असा हवामान खात्याने पुढील तीन महिन्यांसाठी अंदाज दिला आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था व राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता सांगतात.

उष्णतेच्या लाटेमुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण), चक्कर, थकवा येणे, शरीरातील ताकद कमी होते. पण वेळेवर काळजी घेतली तर उष्णतेच्या लाटेचा सामना करता येईल. शक्य असल्यास दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. कामाच्या वेळा बदलाव्यात. कामाच्या ठिकाणी पाणी, सावली निवारा असावा. दरम्यान, या वर्षी कमाल तापमानात वाढ होणार आहे. पण किमान तापमानातही घट होणार आहे.

सपाट भागात सरासरी 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान झाले तर उष्णतेची लाट म्हणून समजतात. समुद्र  किनारपट्टीच्या भागात आर्द्रता जास्त असल्याने 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाले तर उष्णतेची लाट म्हणतो. एखाद्या दिवशी अपेक्षित तापमानापेक्षा साडेचार अंश सेल्सिअसने तापमान वाढले तर उष्णतेची लाट समजली जाते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 एप्रिलनंतर उष्णतेचे चटके लागतील. 1 मे ते 15 जूननंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पण यंदा 15 एप्रिलनंतर आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत काळजी घ्यावी लागेल.राज्यातल्या 36 जिह्यांपैकी 13 जिह्यांमध्ये दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यात नागपूर व अमरावती विभागाचा प्रामुख्याने समावेश होतो. लातूर, नांदेड, नंदुरबार, जळगावचाही समावेश आहे. पण योजना आखताना संपूर्ण राज्यासाठी आखतो, असे असिमकुमार गुप्ता यांनी सांगितले. यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, पण घाबरण्याची गरज नाही. मुंबई व आसपासच्या भागातही तापमान कधीच नव्हते तेवढे वाढले आहे. पण उष्माघातामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos