महत्वाच्या बातम्या

 भाजप कार्यकर्त्याकडून शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न? : विसापूरात बांधकाम साहित्य जप्त


- तहसील प्रशासनाची धडक कारवाई; शासकीय भूखंडावरील साहित्य व नादुरुस्त वाहन ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील भिवकुंड परिसरात शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधकाम साहित्य साठवून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने गुरुवारी २१ मे रोजी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य तसेच एक नादुरुस्त वाहन जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अतिक्रमण व शासकीय जागांच्या गैरवापराविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विसापूर येथील भिवकुंड परिसरातील सर्वे क्रमांक १०६ मधील सुमारे ३.८४ हेक्टर आर शासकीय जमिनीच्या एका भागावर काही नागरिकांनी घरबांधणीसाठी पट्टे मिळावेत यासाठी अर्ज सादर केले आहेत. या अनुषंगाने जागेची पाहणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत घटनास्थळी गेल्या असता, अंगणवाडीसाठी राखीव असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक चौकशीत हे साहित्य भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच भारत ऊर्फ भारद्वाज उत्तम जीवने यांनी अनधिकृतपणे ठेवले असल्याचे आढळून आल्याचा अहवाल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे सादर केला. तसेच संबंधित जागेवर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असल्याचेही आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही संबंधित व्यक्तीकडून शासकीय भूखंड बळकावण्याच्या उद्देशाने जागेचा वापर केला जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार अजय मल्लेरवार, ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत शासकीय जागेवर ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्य आणि एक नादुरुस्त वाहन जप्त केले.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे शासकीय जमिनींवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून अशा प्रकारच्या प्रकरणांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos