चितेंगाव शिवारातील कोंबड्यांच्या झुंजीवर मूल पोलिसांचा छापा : ३ जण अटकेत, ₹१०,८५० चा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल तालुक्यातील चितेंगाव शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांची बाजी लावत जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर मूल पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. या कारवाईत दोन जखमी कोंबडे, लोखंडी कात्या, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण १० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मौजा चितेंगावजवळील जंगल परिसरात मोहाच्या झाडाखाली काही व्यक्ती कोंबड्यांच्या पायाला लोखंडी कात्या बांधून त्यांची झुंज लावून पैशांची बाजी लावत असल्याची खात्रीशीर माहिती मूल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी २१ जून रोजी दुपारी सुमारे सव्वाबारा वाजताच्या सुमारास पंचांसह घटनास्थळी अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान पोलिसांनी शोएब वसीमपठाण (२५) , रा. वार्ड क्र. ११, मूल, संदीप प्रभाकर मेश्राम (वय ३२), रा. वार्ड क्र. ११, मूल आणि रोहित लक्ष्मीचंद गुलानी (वय ३२), रा. वार्ड क्र. १, मूल यांना ताब्यात घेतले. मात्र, रीतिक विनोद देशमुख रा. चितेंगाव आणि यश गणेश बल्लावार रा. चितेंगाव हे दोघे जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन जखमी कोंबडे, दोन लोखंडी कात्या, अंगझडतीत मिळालेली ४५० रुपयांची रोख रक्कम तसेच १० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० हजार ८५० रुपये आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, पोलीस अंमलदार आतिश मेश्राम, प्रकाश विक्रम आणि तक्षशिल मेश्राम यांनी केली.
News - Chandrapur




Petrol Price




