सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी वान्मथी सी


- लेझर लाईट, डीजेचा अतिरिक्त आवाज नको
- जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : येत्या काही दिवसात जिल्ह्यात विविध सण, उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरे केले जाणार आहे. या आनंदाच्या काळात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, सर्व सण उत्सव शांततेत पार पडेल, यासाठी मंडळांसह सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने शांतता व समन्वय समितीची सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी शोभिता पाठक तसेच शांतता समितीचे सदस्य, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आगामी सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात यावे. विशेषत: गणेशोत्सव काळात अधिक काळजी घेण्यात यावी. गणेश विसर्जन मार्गातील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा. आवश्यक तेथे रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी. संबंधित भागातील पोलिस अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या मदतीने मंडळांच्या संपर्कात राहून उत्सव गालबोट न लागता उत्साही वातावरणात पाड पाडण्यासाठी प्रयत्न करावे. या काळात स्वच्छता, मोकाट जणावरे व कुत्रे यांचा उपद्रव किंवा अडथडा होणार नाही, हे पाहावे.
शहरी भागात गणेशोत्सव काळात वाहतुक व्यवस्थापन करावे, कुठेही वाहनांची गर्दी होऊन मार्ग अडथळायुक्त होऊ नये. पोलिस विभागाने यादरम्यान पोलिस फिरत्या पथकांची कारवाई गतीमान करावी. मंडळाच्या सदस्यांनी परिसरात अस्वच्छता, सुव्यवस्था होणार याकडे लक्ष द्यावे. सण, उत्सव काळात अफवा पसरविणे किंवा चुकीच्या गोष्टी कोणी करीत असल्यास मंडळांनी अशा घटनांची प्राथमिक माहिती पोलिस विभागास द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईळ. यामुळे अनुचित प्रकार टाळण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरवणूक काळात डीजीचे आवाज कोणत्याही परिस्थितीत निर्धारीत आवाजापेक्षा अधिक असून नये तसेच मिरवणूकीत लेझर लाईटचा वापर व रात्री 10 वाजतानंतर ध्वनीक्षेपकांचा वापर मंडळांनी करु नये. डीजे आवाजाबाबत प्रमाणपत्र पोलिस विभागाकडून घेण्यात यावे. डीजेचा आवाज आणि लेझर लाईट मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाबी असल्याने याबाबतीत कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी देखील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सण, उत्सव आनंदाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्या कृतीमुळे या आनंदाला गालबोट लागता कामा नये, असे सांगितले. सदाशिव वाघमारे, सुरज गोहाड यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही विषय मांडले. त्यावर वेळेत कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे यांनी मंडळांनी उत्सव काळात अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
महिलांसाठी दामिनी व्हाट्सॲप हेल्पलाईन -
जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दामिनी व्हाट्सॲप हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर महिला, मुली आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. या हेल्पलाईनच्या पोष्टरचे अनावरण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सदर हेल्पलाईन क्रमांक 7620520025 असा आहे.




Petrol Price




