महत्वाच्या बातम्या

 मोई येथील बंजारा महिला शेतकरी गटाची गटशेती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. अतिशय दुर्गम आणि सर्वच घटकातील महिला अभियानाच्या साथीने आर्थिक प्रगती साधत असल्याचे दिसून येते.

आष्टी तालुक्यातील मोई या दुर्गम गावातील महिलांनी गटशेतीच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग शोधला आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेले बंजारा समाजबहुल हे गाव उमेदच्या प्रोत्साहनाने बदलत आहे.

उमेद अभियानाने गावात महिलांना एकत्र करून गटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. गावात महिला एकत्र येऊ लागल्या. याच काळात उमेद व पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप स्पर्धा तालुक्यात सुरु झाली होती. सुरुवातीला या स्पर्धेबद्दल फारशी माहिती नव्हती.

कुठलेही प्रशिक्षण नव्हते, पण मनात जिद्द होती काहीतरी करून दाखवायची. आजूबाजूच्या गावातील महिलांकडून माहिती घेत, बंजारा समाजातील बारा महिलांनी एकत्र आणून बंजारा महिला शेतकरी गट तयार करण्यात आला.

सुरुवातीला गटशेती, सेंद्रिय शेती पद्धती याबद्दल काहीच माहिती नव्हती. समाजातील परंपरेमुळे घुंगट घेऊन राहणाऱ्या, बाहेर पडायला संकोच करणाऱ्या महिलांना एकत्र आणणे मोठे आव्हान होते. पण समजावून सांगत, एकमेकांचा आधार घेत उमेदने महिलांना सोबत घेत कामाला सुरुवात केली.

पानी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी माती परीक्षण केले, दशपर्णी तयार केले, उगवणक्षमता तपासली, चिकट सापळे लावले. हळूहळू प्रत्येक गोष्ट शिकत त्यांनी कमी खर्चात शेती करण्याचे तंत्र आत्मसात केले. खर्च कमी आणि उत्पादन जास्त हेच त्यांचे ध्येय बनले.

एकमेकींच्या शेतात जाऊन काम करणे, नवीन तंत्र शिकणे, सातत्य ठेवणे सुरु झाले. या मेहनतीचे फळ मिळाले. शेतीतील उत्पादन वाढले आणि महिलांचा आत्मविश्वासही दुप्पट झाला. या यशस्वी प्रवासाचा परमोच्च क्षण म्हणजे पुण्यात झालेल्या कार्यक्रमात आमिर खान यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे होय. हा सन्मान फक्त बक्षीस नव्हता, तर त्यांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा गौरव होता.

आज या महिला आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. समाजात ठामपणे उभ्या आहेत. गटशेतीतून एकत्र काम करत, विषमुक्त शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. पानी फाऊंडेशन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून गावाबाहेर पडण्याची, शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, याबद्दल मोई गावातील सर्व महिला आज आनंदी आणि समाधानी आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos