देसाईगंज शहरात घर जाळण्याचा प्रयत्न, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरातील हनुमान वार्डातील श्रावण मारोती भानारकर यांचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २२ डिसेंबर रोजीर रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
भानारकर हे हनुमान वार्डात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्याने आहेत. ते टॅक्टर चालक आहेत. काल २२ डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबीयांसोबत झोपले असताना रात्री १२.४५  वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी सर्व सदस्य जागे झाले. घराची खिडकी उघडून बाहेर बघितले. तसेच दरवाजा उघडून बघितला असता अज्ञात इसमाने गॅस सिलींडर व रेग्युलेटर द्वारे पाईप लावून दरवाज्यातून गॅस सोडली व आग लावून दिल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. या आगीत भानारकर यांचे दहा हजारांचे नुकसान झाले आहे. भानारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवी ४३६ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिध्दानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. भानारकर यांच्या घरात सिलींडर द्वारे स्फोट घडवून उडवून देण्याचा अज्ञात व्यक्तीचा उद्देश असावा, अशा चर्चा शहरात सुरू आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-23


Related Photos