महत्वाच्या बातम्या

 आरमोरीत मजुरांच्या वादातून १९ वर्षीय तरुणावर फावड्याने हल्ला


- माझ्याकडील मजूर भडकवले या संशयातून मारहाण; आरमोरी पोलिसांत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : मजुरांना कामावरून फूस लावल्याच्या संशयातून एका १९ वर्षीय तरुणावर लोखंडी फावड्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना आरमोरी शहरातील इंदिरानगर बर्डी परिसरात शुक्रवारी (२६) सकाळी घडली. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम भारत करंडे (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रीतम करंडे हा शिक्षणासोबतच मिस्त्री कामावर मजुरी करतो. यापूर्वी तो संदीप मनोहर शेंडे (वय ३४) याच्याकडे कामाला जात होता. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे प्रीतमने तेथील काम सोडले होते. शुक्रवारी सकाळी प्रीतम हा इंदिरानगर बर्डी परिसरातील एका घरबांधणीच्या ठिकाणी काम करत असताना आरोपी संदीप शेंडे अचानक तेथे आला. तू माझ्याकडील मजुरांना भडकवून माझे काम बंद पाडले, असा आरोप करत संदीपने प्रीतमशी वाद घालण्यास सुरुवात केली.

जीवे मारण्याची दिली धमकी -
हा वाद एवढा विकोपाला गेला की, संतापाच्या भरात संदीपने बांधकामाच्या ठिकाणी असलेले लोखंडी फावडा उचलले आणि थेट प्रीतमच्या डाव्या मांडीवर जोरदार प्रहार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मध्यस्थी करून वाद शांत केला व पुढील अनर्थ टाळला. या मारहाणीनंतर, पुन्हा माझ्या कामात हस्तक्षेप केलास तर जीवे मारीन, अशी धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर जखमी प्रीतम करंडे याने आरमोरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदीप मनोहर शेंडे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos