महत्वाच्या बातम्या

 रस्ता बांधकामादरम्यान टँकरने चिरडून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू : गडचिरोली हादरले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली–धानोरा राज्य महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामादरम्यान पाणी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरने चिरडल्याने १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धानोरा रोडवरील जांभळी परिसरात दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव रिया श्रावण पदा (वय १६, रा. कारवापा) असे असून ती कारवापा येथील शाळेत शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती सायकलने घरी परतत असताना जांभळी गावाच्या सुरुवातीला हा भीषण अपघात घडला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्ता बांधकामस्थळी पाणी मारण्याचे काम करणारा टँकर चालक दारूच्या नशेत होता व अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत होता. नियंत्रण सुटल्याने टँकर थेट रियाच्या अंगावर घुसला. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. टँकरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचे दृश्य पाहून नागरिक हादरून गेले.

संतप्त नागरिकांकडून चालकाला चोप -
घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मृतदेह पाहताच संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी टँकर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत परिस्थिती चिघळली होती.

सुरक्षा उपायांचा अभाव, फलकच नाहीत -
घटनास्थळाची पाहणी केली असता रस्ता बांधकाम सुरू असताना कोणतेही धोक्याचे सूचना फलक, दिशा दर्शक चिन्हे किंवा वाहतूक नियंत्रण व्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले. पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.

साखेरा–जांभळी रस्त्याच्या बांधकामाचा ठेका डी.सी. गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनी यांना पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्यात आला आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावरच नव्हे तर अशा चालकाला कामावर ठेवणाऱ्या आणि सुरक्षा उपाय न राबवणाऱ्या कंत्राटदार कंपनीवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

महामार्ग विभाग व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह -
राज्य महामार्गाचे काम सुरू असतानाही महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस अथवा परिवहन विभागाकडून कोणतीही प्रभावी नियंत्रण यंत्रणा राबवली जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. मोठी वाहने बेदरकारपणे धावत असल्याने जिल्ह्यात वारंवार अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.

लोकांचे जीव स्वस्त झाले आहेत का -
दररोज अपघातांमध्ये मृत्यू होत असतानाही प्रशासन गंभीर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

रिया पदा हिच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos