राज्यपाल विष्णु देव वर्मा यांची माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासोबत सदिच्छा भेट : भेटीदरम्यान विकासावर सविस्तर चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय विष्णु देव वर्मा यांची दिल्ली येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल, दुर्गम तसेच नक्षलग्रस्त आणि विकासाच्या दृष्टीने मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत सकारात्मक आणि दूरदृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व औद्योगिक विकासात ठेवलेले स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने राज्यपालांनीही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे चर्चेत अधोरेखित करण्यात आले.
या चर्चेत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती तसेच नक्षलप्रभावित भागातील विकासकामांना गती देण्याबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.
विशेषतः यापूर्वी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भामरागड तालुका दत्तक घेत विकासासाठी पुढाकार घेतला होता, त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील एखादा तालुका दत्तक घ्यावा तसेच जिल्ह्याचा प्रत्यक्ष दौरा करावा, अशी विनंती डॉ. नेते यांनी राज्यपालांना केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यपाल महोदयांनी लवकरच गडचिरोली दौऱ्यावर येण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे हे देखील उपस्थित होते. सदिच्छा भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
News - Rajy




Petrol Price




