शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा : सहभागी होण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) मार्फत महाराष्ट्रासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळा एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे हा आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाबरोबर कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणा सक्रिय सहभाग घेत आहेत.
१ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य, कमीत कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. ८ एप्रिलला जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन, बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व त्यांचे फायदे. १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन तसेच लिंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर आणि २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र, भाताची थेट पेरणी, श्री पद्धत आणि यांत्रिकी पद्धतीने भात लावणी बाबत माहितीचे आदानप्रदान होणार आहे.
सर्व शेतीशाळा सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून त्यांचे थेट प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि उमेद यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विभागातील तज्ज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून ज्ञानाचे आदानप्रदान होणार आहे.
शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बियाणे उत्पादक, फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी गट तसेच वनपट्टे धारक यांनी मोठ्या संख्येने या डिजिटल शेतीशाळांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




