वाघाच्या हल्ल्यात इसम ठार : सावली तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुक्यातील करगाव येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने हमला करून ठार केल्याची घटना आज (10) रोजी घडली. डोंगरगाव येथील दादाजी पांडुरंग मस्के (वय 65) असे मृतकाचे नाव असून सदर घटना ही पाथरी बीटातील कक्ष क्रं. 1679 येथे घडली.
सविस्तर वृत्त असे की, मृतक पांडुरंग मस्के हे डोंगरगाव येथील रहिवासी असून ते करगाव येथील नातेवाईकाच्या घरी आले होते. ते पाथरी बिटातील कक्ष क्रं. 1679 मध्ये नातेवाईकांसोबत सरपण गोळा करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हमला करून दादाजी मस्के यांना ठार केले.
पाथरी परिसर जंगलव्याप्त असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्र पशुचा वावर आहे. दिवसेंदिवस गँस भाववाढीमुळे ग्रामीण भागातील जनता सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जात आहेत. आज घडलेल्या घटनेमुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच सावली तालुका परिसरात प्राण्यांना पिण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले असून पाणवठ्यात पाणी नसल्याने हिंस्त्र पशु गावच्या दिशेने मार्गक्रम करीत असून याकडे मात्र संबधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतकाच्या परिवाराला 25 हजाराची आर्थिक मदत सभापती विजय कोरेवार पंचायत समिती सावली यांच्या हस्ते कुटुंबीयांना दिली. यावेळी सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी, पाथरी येथील क्षेत्रसहाय्यक कोडापे, विशाखा शेंडे, कल्याणी पाल, राकेश चौधरी आदी कर्मचारी हजर होते. म्रूतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2021-03-11


Related Photos