महत्वाच्या बातम्या

 भरदिवसा घरफोडीचा थरार : कुलूप तोडून २.९२ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील गोरक्षण वॉर्ड परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोरक्षण वॉर्ड, भालेराव शाळेसमोर राहणाऱ्या रजिता परमेश्वर सिंघाराव (वय ३९) या चंद्रपूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१९) सकाळी त्या नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून नोकरीसाठी चंद्रपूरला गेल्या होत्या. त्यांचे पती नागपूर येथे वेकोलि मध्ये कार्यरत आहे तर घरातील ज्येष्ठ महिला दुसऱ्या ठिकाणी राहत असल्याने घर दिवसभर बंद होते.

सायंकाळी सुमारे ८ वाजता घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाज्याचे कुलूप तोडलेले पाहून त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घराची पाहणी केली. यावेळी बेडरूममधील लोखंडी कपाटांचे लॉकर फोडून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघड झाले.

चोरीस गेलेल्या मालामध्ये दोन तोळ्यांचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्यांचा राणीहार, सहा ग्रॅमचे सोन्याचे झुमके, दोन सोन्याच्या अंगठ्या, मुलीचे विविध सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीच्या पायपट्ट्या तसेच ५ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत २ लाख ९२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शेजारील नागरिकांच्या माहितीनुसार दुपारी साडेएक वाजेपर्यंत घर सुरक्षित होते. त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ व ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos