जेतवन बुद्ध विहार आरमोरी येथे महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार


- महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२६ रोजी येथील जेतवन बुद्ध विहार, आरमोरी येथे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरी, महिला लोक आयोग शाखा आरमोरी, महिला बचत गट आरमोरी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, संविधानातील अधिकार, सामाजिक जागृती तसेच महिलांच्या स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वी दारूचा व्यवसाय सोडून सन्मानाने स्वावलंबी जीवन जगण्यास सुरुवात केलेल्या जिद्दी महिलांचा भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरीच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा विशेष सन्मान करून समाजासमोर आदर्श ठेवण्यात आला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुशीला कोल्हटकर यांनी कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी महिलांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. लक्ष्मी मने यांनी श्रद्धा असावी पण आंधळी नसावी, असे सांगत विवेकी विचारांची गरज व्यक्त केली. डॉ. कविता खोब्रागडे यांनी महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. मंजुषा दोनारकर यांनी महिलांवरील अन्यायाविरोधात भारतीय संविधान खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. भावना बारसागडे यांनी हिंदू कोड बिलामुळे महिलांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारांची माहिती दिली. कल्पनाताई ठवरे यांनी वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी सजग राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सुनिता तागवान यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती अमरदीप मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमुता मेश्राम यांनी मानले.
News - Gadchiroli




Petrol Price




