काम व रोजगाराच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटविला : एलसीबीकडून दोघांना अटक, चौघांची नावे निष्पन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : काम व रोजगारासंबंधीच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरच्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. २९ सप्टेंबर रोजी रात्री घुग्घुस ओपनकास्ट कोळसा खदानीजवळ ही घटना घडली होती.
घुग्घुस ओपनकास्ट खदानीजवळ २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या दरम्यान कोळसा वाहतूक करणारा महिंद्रा ट्रक क्रमांक एमएच ३४ सीक्यू ३३८५ अज्ञात व्यक्तींनी अडवून पेटवून दिला. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले. ट्रकचालक रमाकांत बाबूलाल सिंह ३५ वर्ष , रा. नकुनी, ता. बेहारी, जि. सहडोल, मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (फ), १२६ (२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. या तपासातून खुर्शीद उर्फ फरदीन इक्रम शेख २६ वर्ष रा. शास्त्रीनगर वॉर्ड क्रमांक १, घुग्घुस आणि समशेर महेबूब शेख २९ वर्ष रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस यांचा या घटनेतील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
प्राथमिक तपासानुसार, काम व रोजगारासंबंधीच्या नाराजीतून आरोपींनी संगनमत करून ट्रक पेटविण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. पेट्रोलचा वापर करून ट्रकला आग लावण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात इरफान शेख रा. श्रीराम वॉर्ड, घुग्घुस आणि अफताब नफीस शेख रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस यांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणातील सर्व संबंधितांची भूमिका निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, पोलीस हवालदार सतीश अवधरे, इम्रान खान, लालू यादव, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, पोलीस अंमलदार किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार तसेच सायबर पोलीस ठाण्यातील कार्तिक खनके, अनिमेश आणि गुणवंत यांनी केले.




Petrol Price




