लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लसीकरण मोहीमेला सुरुवात: लसीकरण करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सध्या गुरांना लाळ्या खुरकूत रोगाची साथ दिसत असल्याने तालुक्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुंचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नितीन फुके यांनी केले आहे. जिल्हयातील तालुक्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरणाची आठवी फेरी १३ फेब्रुवारी ते २९ मार्च, २०२७ या कालावधीत होणार आहे.
राज्य लाळ्या खुरकूत रोगमुक्त करणे हा लसीकरणाचा उद्देश आहे. लाळ्या खुरकूत रोग हा एका पशुपासुन दुसऱ्या पशुला होणारा सांसर्गीक रोग आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हयात २० व्या पशुगणनेनुसार गाय वर्ग ४ लाख १८ हजार ५४८ व म्हैस वर्ग ७२ हजार ४८२ असे एकूण ४ लाख ९१ हजार ३० पशुधन संख्या आहे. लाळ्या खुरकूत रोग होऊ नये म्हणून लसीकरण करणे बंधनकारक आहे.
प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायद्यानुसार जर एखादा पशुपालक रोगप्रतिबंधक लसीकरण आपल्या पशुधनास करून घेण्यास नकार देत असेल तर अशा पशुपालकावर शिक्षा म्हणून दोन हजार रुपये तसेच एक महिन्याचा कारावास अशी तरतूद आहे. पशुधन लाळ्या खुरकूत रोगाला बळी पडू नये व औषधांवरील खर्च कमी होण्यास प्रतिबंधात्मक लसीकरण शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या फायद्याचेच आहे.
त्यामुळे जिल्हयातील सर्व पशुपालक व शेतकऱ्यांनी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नितीन फुके यांनी केले आहे.
News - Nagpur




Petrol Price




