महत्वाच्या बातम्या

 नक्षल्यांनी सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना केली मारहाण


 - ५ दुचाकींची केली जाळपोळ 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आसा-कोरेपल्ली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना नक्षल्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या ५ दुचाकी जाळल्याची घटना गुरुवारी ५ वाजताच्या सुमारास नैनेरे मार्गावर घडली. रात्री उशिरा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जिल्ह्यात प्रशासनाकडून दुर्गम भागात रस्ते निर्मितीची कामे केली जात आहे. एकेकाळी नक्षल्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील दुर्गम आसा-कोरेपल्ली मार्गाच्या प्रस्तावित बांधकामाचे सर्वेक्षण करण्यासाठी वनविभागाची चमू गुरुवारी तेथे गेली होती. परत येताना नैनेर मार्गावर ५ बंदुकधारी नक्षल्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन निरीक्षकासह १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेत कर्मचाऱ्यांच्या ५ दुचाकी देखील जाळल्याची माहिती सिरोंचा वनविभागाचे उपवसंरक्षक पुनम पाटे यांनी दिली. रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी कमलापूर मुख्यालय गाठून वरिष्ठ कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला. मात्र, नक्षल्यांनी गाड्या जाळल्या की पळविल्या याबाबत अधिक तपासानंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos