महत्वाच्या बातम्या

 रब्बी हंगामात ६५ लाख हेक्टर पेरणीचा अंदाज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. यंदा धरणे आणि विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही, त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि आयुक्त सूरज मांढरे या बैठकीस उपस्थित होते. या वेळी भरणे यांनी कृषी विभागाला सक्षम व समन्वित नियोजन करून शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.

हरभरा, गहू भरघोस येणार -
भरणे म्हणाले, राज्यात दरवर्षी सरासरी ५७ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होते. यावर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी क्षेत्र ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. त्यातील ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर हरभरा व गव्हाची पेरणी होईल.

बियाणे, खतांचा मुबलक साठा -
रब्बी हंगामात ११.२३ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना, प्रत्यक्षात १४.५८ लाख क्विंटल बियाणे शिल्लक असल्याची माहिती भरणे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारकडून ३१.३५ लाख टन खते मिळणार असून, राज्यात १६.१० लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदतीचा अभाव – पवारांची टीका -
बारामती : मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सरकारकडे त्यांना मोकळ्या हाताने मदत करण्याची दानत नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग येथील निवासस्थानी व्यक्त केली.





  Print






News - Wardha




Related Photos