वर्धा जिल्ह्यातील केळापूर येथे डेंग्यूचा तिसरा बळी, एका कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने गावात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
पुलगाव शहराला लागून असलेल्या केळापूर येथे डेंग्यू आजाराने कहर केला आहे. येथे डेंग्यूमुळे तिसरा बळी गेला. हे तिन्ही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने गावात खळबळ माजली आहे. 
मृताचे नाव अविनाश विजय मुंजेवार (२३) असं आहे. अविनाश यांना नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज  २७ ऑगस्ट रोजी अविनाश यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अविनाश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर आज अविनाश यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. आरोग्य विभागाकडून गावात उपाययोजना केल्याचा दावा केला जात आहे. पण डेंग्यूने तीन जणांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

जि. प. अध्यक्षांचे निधी देण्याचे आश्वासन

केळापूर येथे डेंग्यूचा तिसरा बळी गेला. यापूर्वी खासदार आणि आमदारांनी गावाची पाहणी करून संबंधितांना निर्देश दिले. तरी देखील प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या नाही. यामुळेच तिसरा बळी गेल्याचा ठपका ठेवत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला.    दरम्यान ५० ते ६० जणांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांची भेट घेऊन परिस्थिती कथन करीत निवेदन दिले. यावेळी अध्यक्षांनी गावातील नाला दुरुस्तीसाठी २० लाख रुपये देण्यासह संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतरच ग्रामस्थ केळापूरकडे रवाना झाले, अशी माहिती मधुकर बोरकर यांनी दिली.
 गावात डेंग्यू आजाराने थैमान घातल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेक जण गाव सोडून जाण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-08-27


Related Photos