अवैध रेती माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका : ५५ लाखांहून अधिक किमतीची वाहने व रेती जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग तीन धडक कारवाया करून रेती माफियांना मोठा दणका दिला आहे. रामनगर, चिमूर आणि तळोधी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये एक हायवा ट्रक, तीन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि मोठ्या प्रमाणात अवैध रेती जप्त करण्यात आली. या कारवायांमध्ये एकूण ५५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मुल उपविभागीय पथकाला २१ मे रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत एमएच-३४-सीक्यू-७८७८ क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आला. वाहनामध्ये सुमारे १० ब्रास रेती आढळून आली. या प्रकरणात देवानंद मारुती सोमणकर (वय ३६), रा. गडचिरोली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन मालक बिट्टू उर्फ हरीश सय्यद रा. चंद्रपूर याचाही तपास सुरू आहे. कारवाईत ४० लाख रुपयांचा हायवा व ७० हजार रुपयांची रेती असा एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर २२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा चिमूर नाल्यात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला. या कारवाईत बापुराव आत्माराम चव्हाण (वय २८), रा. शिवापूर बंदर, ता. चिमूर याला ताब्यात घेण्यात आले. तर बबलू जाधव (रा. चिमूर) हा संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक ब्रास रेती जप्त केली. या मुद्देमालाची किंमत ५ लाख ५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या ब्रह्मपुरी उपविभागीय पथकाने तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक कारवाई करत अवैध रेती वाहतूक उघडकीस आणली. पोलिसांनी रेतीने भरलेले दोन ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतले. या प्रकरणात आतिश परसराम मसराम (रा. वलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सागर मेश्राम (रा. वलनी, ता. नागभीड) आणि ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४-बीव्ही-४१८९ चा चालक-मालक यांचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान दोन ब्रास रेतीसह १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिन्ही कारवायांमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९ तसेच जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात अधिकारी च अंमलदारानी केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांची होणारी लूट रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवायांमधून स्पष्ट झाले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




