महत्वाच्या बातम्या

 ४२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांना ३७.७० कोटींच्या मदतीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नागपूर विभागातील शेतकऱ्यांची माती केली आहे. विभागातील सहा जिल्ह्यांतील तब्बल ४२,६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रशासनाने ३७.७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. यातील १३.५६ कोटींची मदत आतापर्यंत मंजूर झाली आहे.

जुलैच्या सुरुवातीला पावसाचा उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मात्र धोधो पाऊस पडून अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे. चंद्रपूरमध्ये १४,१०५.७४ हेक्टर आणि गडचिरोलीत १०,९१२.७३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याशिवाय वर्धा ९०९१.३९ हेक्टर, नागपूर ५६४४ हेक्टर, भंडारा २५८९.१२ हेक्टर व गोंदिया २५८.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जिल्हानिहाय नुकसान व मदतीची मागणी -
नागपूर : ५६४४ हेक्टर – मागणी ४.९० कोटी, मंजुरी ३९२.९२ लाख
वर्धा : ९०९१.३९ हेक्टर – मागणी ८.०१ कोटी, मंजुरी २३०.६७ लाख
चंद्रपूर : १४,१०५.७४ हेक्टर – मागणी ७.३३ कोटी, मंजुरी ७.३३ कोटी
गडचिरोली : १०,९१२.७३ हेक्टर – मागणी १२.९० कोटी, मंजुरी शून्य
गोंदिया : २५८.३२ हेक्टर – मागणी २.३४ कोटी, मंजुरी शून्य
भंडारा : २५८९.१२ हेक्टर – मागणी ४.३३ कोटी, मंजुरी शून्य

कोणत्या पिकांचे नुकसान?

भात, सोयाबीन, कापूस, मिरची, संत्रा व मोसंबी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पुरामुळे शेती खरडून गेली, तर वर्ध्यात कापूस आणि नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबी व मिरचीबरोबरच धान आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.





  Print






News - Nagpur




Related Photos