महत्वाच्या बातम्या

 रावणवाडी उपकेंद्राची क्षमता झाली दुप्पट : ५ पासून झाली १० KVA क्षमता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : रावणवाडी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून भारनियमन आणि कमी दाबाचे वीज पुरवठा होत असल्याने त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा सुद्धा होत नसल्याने रात्री अहोरात्री शेतात जावे लागत होते. या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे. यासाठी नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे मागणी केली होती. 

त्या अनुषंगाने AG-Policy अंतर्गत रावणवाडी उपकेंद्रच्या रोहित्राचे क्षमता वाढविण्यासाठी मंजुरी प्रदान झाली असून १६ फेब्रुवारी रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. विजेचा पुरवठा केवळ ५ KVA असल्याने नागरिकांना आवश्यक तेवढा वीज पुरवठा करता येत नसल्याने भारनियमन करावे लागत असे. शिवाय विजेचा दाब कमी असल्याने वारंवार ट्रीप होण्याची समस्यांमुळे अवेळी वीज पुरवठा खंडित असल्याची समस्या निर्माण होत होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज पुरवठा वाढण्यासाठी सूत्र हलविले. अखेर त्यांचा प्रयत्नांना यश प्राप्त होत ५ kVA संच बदलून १०kVA करण्याचे कामाला मंजुरी मिळाली. या कामासाठी १ कोटी ८० लक्ष एवढा निधी मंजूर करून रावणवाडी उपकेंद्रातील सर्व उपकरणे बदलून १० kVA एवढ्या क्षमतेचे संच बसविले जाणार आहेत. हे संपूर्ण कार्य उन्हाळा सुरु होण्याआधी पूर्ण होणार असून या उन्हाळ्यात नागरिकांना कमी दाबाच्या वीज पुरवठामुळे होणारा त्रास होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना सुद्धा मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होणार आहे. यामध्ये रावणवाडी, मुरपार, कटंगी, नागरा, टेमनी,वडेगाव, आसोली, चारगाव, भादूटोला, खातीया, बटाना, अंभोरा, सावरी, लोधीटोला, गर्रा (बु.), गर्रा खुर्द, बघोली, कलारीटोला, घिवारी, गोंडीटोला या परिसरातील गावांना लाभ मिळणार आहे.





  Print






News - Gondia




Related Photos