मिनी ट्रकची दुचाकीला धडक : २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बोंडगावदेवी परिसरात हळहळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी ते सानगडी मार्गावरील बोंडगावदेवीजवळ शुक्रवारी २५ जुलै सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एक २७ वर्षीय युवक ठार झाला. भरधाव मिनी ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत सुमेध जयदेव रामटेके (२७, रा. बोंडगावदेवी) या तरुणाचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेचा तपशील -
प्राप्त माहितीनुसार, सुमेध रामटेके हा शुक्रवारी आपल्या एमएच ३५ एपी ४८५३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून अर्जुनी मोरगाव येथे गेला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास तो बोंडगावदेवीकडे परतत असताना, एमएच ३१ एम ८०६३ क्रमांकाच्या भरधाव मिनी ट्रकने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत सुमेध गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडून राहिला.
यावेळी अपघात स्थळाजवळून जाणाऱ्या काही नागरिकांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून १०८ आपत्कालीन क्रमांकावर रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमी सुमेधला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला गोंदिया जिल्हा रुग्णालयात रेफर केले. दुर्दैवाने, गोंदियाकडे नेण्याच्या मार्गातच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस कारवाई -
घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताची नोंद करून मिनी ट्रक आणि त्याचा चालक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गावात शोककळा -
सुमेध रामटेके हा एक उत्तम स्वभावाचा, तरुण व आशावादी युवक होता. त्याच्या अचानक जाण्याने बोंडगावदेवी गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत शोकसंवेदना व्यक्त केल्या.
News - Gondia




Petrol Price




