महत्वाच्या बातम्या

 करचखेडा पुलावर कार-दुचाकीची भीषण धडक : दुचाकीस्वार गंभीर जखमी, सात प्रवासी थोडक्यात बचावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा तालुक्यातील भिलेवाडा-करडी मार्गावरील करचखेडा पुलावर शुक्रवारी ३ सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर कार पुलाखाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. कारमध्ये सात प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातातील जखमीचे नाव चेतन रूपचंद भेडारकर ३०, रा. आमगाव, ता. भंडारा असे आहे. प्राप्त माहितीनुसार, चेतन भेडारकर हे एमएच-३१-व्ही-२०१७ क्रमांकाच्या मोटारसायकलने खमारी येथून आपल्या गावी जात होते. त्याचवेळी भिलेवाडा येथून खमारीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच-४९-बीडब्ल्यू-६५९० क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जबरदस्त होती की, चेतन भेडारकर यांच्या उजव्या पायाला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमीला मदत केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले होते. मात्र कार पुलाखाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याने कारमधील सातही प्रवाशांचे प्राण वाचले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या अपघातामुळे काही काळ भिलेवाडा-करडी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos