मेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे


- स्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योगकता जागृती अभियान कार्यक्रमाला नव उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली सारख्या उद्योग विरहित जिल्ह्यात मेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून जिल्ह्यातील नवीन १०० नवं उद्योगांची सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन दलित इंडियन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले. 
मेक इन गडचिरोली,  दलित इंडियन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन गडचिरोली येथे आयोजित स्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योगकता जागृती अभियान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मेक इन गडचिरोलीचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंग, सिडबीचे ए.जी. मुकेश कुमार, डिक्की वेस्टर्न इंडिया चे अध्यक्ष निश्चय शेळके  , औ.वि.म. चे  प्रादेशिक अधिकारी जे.बी. संगीतराव ,  अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, डिक्की चे विदर्भ चापटर गोपाल वासनिक  नागपूर, एलडीएम प्रमोद भोसले, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन चे  पंकज बोकारे , डिक्की चे उपाध्यक्ष रूपराज गौरी  , प्रकाश इटनकर, जिल्हा उद्योग केंद्र, इंडस्ट्रिलय डिझायनर जॉनी दासरवार, श्रीनिवास दंतुलवार यांचेसह विविध बँकांचे व्यवस्थापक प्रामुख्याने उपस्थित होते. 
गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून नोंदणी व निवड प्रक्रिया झालेल्या १०० उद्योजकांना बोलाविण्यात आले होते. या १०० उद्योजकांना लवकरच आपले उद्योग सुरु करता यावे याकरिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलतांना पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी उद्योजकांना उद्योग विषयक अडचणी व उद्योग सुरु कारण्याविषयक माहिती दिली. मेक इन गडचिरोली व आमदार महोदयांचे विशेषत्वाने कौतुक करीत मेक इन गडचिरोली संदर्भात आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू असे आश्वस्त केले. 
या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आमदार महोदयांनी मेक इन गडचिरोली ची  भूमिका मांडली व लवकरच जिल्ह्यात १०० उद्योगांच्या कामास गती येईल याबाबत उपस्थितांना आश्वस्त केले. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी डिक्की, सिडबी व बँकेच्या अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेक इन गडचिरोलीचे जिल्हा संयोजक रमेश अधिकारी, जनार्धन साखरे, राकेश भैसारे, प्रसाद गुंफलवार, हैद्राबाद टीमचे राजू व जीवन यांनी प्रयत्न केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-11


Related Photos