उन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी तुमसर तालुक्याचा कृती आराखडा


- जलस्रोत संवर्धन, तलावांचे खोलीकरण आणि भूजल पुनर्भरणावर भर; गावनिहाय आराखडा तयार करण्याचे तहसीलदारांचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तुमसर तालुका प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना सुरुवात केली आहे. जलस्रोतांचे संवर्धन, तलावांचे खोलीकरण, भूजल पुनर्भरण, शेततळ्यांची निर्मिती आणि अवैध पाणी उपशावर नियंत्रण अशा विविध उपाययोजनांचा समावेश असलेला सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासोबतच शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष जनसंवाद बैठकीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, जलस्रोतांचे संवर्धन तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रत्येक गावातील पाण्याची सद्यस्थिती आणि आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन निश्चित करण्यावर भर देण्यात आला.
गावातील तलाव, पाझर तलाव आणि सार्वजनिक जलस्रोतांमधील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. सार्वजनिक जलस्रोतांच्या ५०० मीटर परिसरात होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी माहिती संकलित करावी आणि नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा अनधिकृत वापर रोखल्यास उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.
तसेच गाळमुक्त धरण-गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत तलाव आणि जलसाठ्यांमधील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तलावांचे खोलीकरण, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे आणि शेततळ्यांची निर्मिती यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय व्हीबी रामजी योजना तसेच वनविभागामार्फत प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचाही गावनिहाय कृती आराखड्यात समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी तहसीलदार उपेश अंबादे यांनी ग्रामपंचायत, महसूल, कृषी, वनविभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. संबंधित सर्व विभागांनी येत्या दोन दिवसांत आपल्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय कृती आराखडा तयार करून तो ग्रामसभेच्या मंजुरीसाठी सादर करावा. प्रत्येक गावातील पाणीटंचाईची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांची आखणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राजू कारेमोरे यांनी जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनासोबतच ग्रामस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. तयार केलेला कृती आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे आणि प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे दिसली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने आखलेल्या या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. गावनिहाय आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी, संबंधित विभागांचा समन्वय, जलस्रोतांचे संरक्षण आणि लोकसहभागातून कामांची वेळेत पूर्तता झाल्यास पाणीसाठा वाढविण्यासह भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.या जनसंवाद बैठकीला उपविभागीय अधिकारी गणेश दिघे, गटविकास अधिकारी नंदकिशोर वालेकर, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.




Petrol Price




