आष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा


- बामणी ते आष्टी आणि देवरी ते सिरोंचा राष्ट्रीय मार्गाचे सर्व्हेक्षण करून दलदल जमिनीचा शोध घ्या
- बामणी ते आष्टी व देवरी ते सिरोंचा या राष्ट्रीय चारपदरी महामार्गाच्या कामाला  सुरुवात करा 
- राष्ट्रीय विकास मंच चे केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला  जोडण्यासाठी १७ डिसेंबर १९६० साली आष्टी येथील वैनगंगा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. सतत ५८ वर्षांपासून वैनगंगा नदीवरील या पुलाने या दोन्ही जिल्ह्याला जोडून आपले विकासाचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे.  मात्र या पुलाची निर्मिती होऊन ५८ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी झाल्यामुळे हा पूल कालबाह्य झाला आहे. तसेच खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचून राहत असल्यामुळे हा पूल अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यामुळे हा पूल कोसळल्यास चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटून या परिसरातील शैक्षणिक, व्यापारी व वाहतूक समस्या निर्माण होणार असून नवीन पूल बांधकाम करण्यास जवळपास दोन वर्ष लागत असल्यामुळे दुर्घटना होण्याची वाट न पाहता आष्टी येथील वैनगंगा नदीवर चारपदरी नवीन पुलाची निर्मिती करून विकासाला सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रीय विकास मंच ने केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
 निवेदनात म्हटले आहे की , बामणी ते आष्टी व देवरी ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग जंगल परिसरातून जात असल्यामुळे अनेक ठिकाणीही जमीन   दलदल, ओलावा असलेल्या स्वरूपाची आहे. त्यामुळे या मार्गावर कितीही वेळा रस्त्याची दुरुस्ती केली तरी दलदल असणाऱ्या ठिकाणी रस्ता उखडून जाऊन अपघाताला आमंत्रण देत असते. त्यामुळे याच मार्गावरील नाही तर राष्ट्रातील सर्वच मार्गावरील रस्ता होण्यापुर्वी दलदल असणाऱ्या किंवा जंगलाच्या परिसरात जेथे पाणी साचून राहते. अशा जागेचा  शोध घेऊन त्या ठिकाणी डांबरीकरण उखळणार नाही म्हणून विशेष पद्धतीचा वापर करून दलदल असणाऱ्या जागेवर रस्त्याचे काम करावे. जेणे करून शासनाचा पैसा व जनतेचा त्रास वाचविण्याकरिता राष्ट्रीय महामार्गाचे सर्व्हेक्षण करावे.
   बामणी ते आष्टी व देवरी ते सिंरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्यास अतिदुर्गम, आदिवासी भागाचा संपर्क शहराशी येऊन नक्षलवाद सारख्या समस्या आपोआप कमी होऊन दुर्गम भागातील भाजीपाला, दूध व इतर उत्पादनाला बाजारपेठ निर्माण होऊन शेतकऱ्यांना आपल्या सोईनुसार आपले उत्पादन नागपूर सारख्या शहरात विकता येईल. 
तसेच भविष्यात विदर्भ राज्य निर्माण होत असल्यामुळे चिमूर, अहेरी जिल्ह्याची निर्मिती स्वाभाविक आहे. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करून बामणी ते आष्टी आणि देवरी ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाला चारपदरीची मान्यता देऊन बांधकामाला सुरुवात करून या परिसराच्या विकासाला सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos